26 February 2007

रेल्वे अर्थसंकल्प: महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय? Railway budget with discrimination against Maharashtra

नेहमी प्रमाणे नेहमीच्या 'बिहारी' रेल्वेमंत्र्यांनी नेहमीच पाने पुसल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर या ही वेळेस नेहमीच्या रेल्वे अर्थसंकल्पात अन्याय केला आहे. मला राग आणि विषाद वाटतो तो महाराष्ट्रातील खासदार (members of parliament) यांचा हे लोक, आपल्या राज्याच्या भल्यासाठी लालूंवर दबाव का आणीत नाहीत? मुंबई जी रेल्वेला उत्पन्नाबाबत सिंहाचा वाटा देते तिथे फक्त उत्तर प्रदेश बिहार व अन्य बिमारु राज्यातील गाड्या आणल्या जातात. त्यात भर म्हणून पुणे-गोरखपूर गाडी सुरु केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातले लोक चुकुनही गोरखपुरला जात नाहीत. आम्हाला औरंगाबाद, नाशिक व नागपुरच्या गाड्या वाढवून हव्या आहेत. पुणे-लोणावळा व पुणे-दौंड उपनगरीय गाड्यांबाबत विचार केला जावा अशी आमची इच्छा. आमच्या ४२ पिढ्यातील कोणीही पुणे-पटना वा पुणे-भागलपूर अशा गाड्या मागितल्या नव्हत्या. आशा पुढील वेळेस रेल्वेमंत्री बिहारचा नसेल. आणि हो, ममता पण नको!

25 February 2007

सारेगमप महागायक विजेता- अभिजीत कोसंबी Saregamapa winner Abhijeet Kosambi

काल आयडिया सारेगमपची महाअंतिम फेरी दिमाखात झाली. फक्त निकाल काय तो धक्कादायक होता. मंगेश बोरगांवकर किंवा अनघा ढोमसेंपैकी कोणी जिंकावे अशी माझी इच्छा होती पण जिंकला अभिजीत कोसंबी! खरं सांगायचं तर हा अभिजीत मला इतका चांगला गायक अजिबात वाटत नाही. महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली ते ठीक आहे पण अनघा व मंगेश ह्यांचं गाणं अत्यंत कानांना मधुर वाटतं. मला संगीतातले काही समजत नाही पण अभिजीतला 'मल्हार वारी' आणि सावरखेड-एक गाव मधले 'हे गाव माझे' या उत्तम गाण्यांची वाट लावताना मी ऐकले आहे! काल बाद झालेल्या स्पर्धकांनी सोहळ्याच्या सुरुवातीला म्हटलेले 'तु चाल पुडं तुला रं गड्या भीती कुनाची' हे गाणं सर्वात उत्तम होते.

असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?

24 February 2007

झी २४ तास आणि मी मराठी

मला खूप आनंद झालाय! झी नेटवर्कची झी २४ तास ही मराठीतील पहिली वृत्तवाहिनी सुरु
झाली आहे आणि लौकरच अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु होत आहे. मराठी
दुरचित्रवाणीचे क्षेत्र विस्तारत आहे हे पाहून बरं वाटतंय. आमच्या कंबख्त केबलवाल्यानं झी २४
तास अजून सुरु केली नाहीये आणि त्याच बरोबर ई.टी.वी मराठी बंद केली आहे. (पे चॅनल झालंय
म्हणून?) मी मराठीचे चाचणी प्रक्षेपण पाहिले. माझ्या मते ही वाहिनी लोकप्रिय होण्यास
वेळ लागणार नाही. फक्त दामिनी, बंदिनी सारख्या मालिका दाखविल्या नाहीत म्हणजे मिळवली!

15 February 2007

सारेगमप ची महाअंतिम फेरी Saregamapa's grand finale




आयडीया सारेगमपची अंतिम फेरी २४ फेब्रुवारीला आहे. या सोमवारी झालेला गोंधळ म्हणजे
दुर्दैवी व स्पर्धकांवर अन्याय करणारा होता. प्रेक्षकांच्या मतानुसार अभिजीत कोसंबी बाहेर
जाणार होता पण परिक्षकांनी ''आम्हाला तिघातील कोणीही गेलं तर वाईट वाटेल'' असा
हट्ट धरला आणी अभिजीतला जीवदान मिळाले. हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्हाला ''कोणीही''
गेला तरी दु:ख होणार होतं (खरंतर अभिजीत कोल्हापूरचा असल्यामुळे अवधुतला दु:ख झालंय!)
तर मग प्रेक्षकांना एसएमएस करायला कशाला सांगितल? अभिजीत कोसंबी हा ठीक गातो पण
त्याच्यासाठी नियम बदलणं वेडेपणा आहे. त्याला जर retain केल गेलं आहे तर आनंदी जोशीला
का नाही? Judgesच्या ह्या एकतर्फी निर्णयाचे आम्ही निषेध करतो.


असो. सोमवारी अनघा ढोमसेनी म्हटलेले ''सर्वस्व तुजला वाहूनी माझ्या घरी मी पाहुणी'' हे
गाणं तसेच प्रत्येक स्पर्धकानी म्हटलेली निवडक गाडी झी मराठीच्या साईट वर उपलब्ध आहेत.

http://zeemarathi.com/Saregamapa/songs.aspx महाअंतिमफेरी साठी मंगेश बोरगांवकर
किंवा अनघा ढोमसे पैकी कोणीही जिंकू देत,दोघही चांगले गातात. पण आनंदीजर grand
finaleत असती तर...alas!

03 February 2007

अरुण साधु म्हणतात मराठीत बोला! Arun Sadhu says ''converse in Marathi''

अरुण साधू यांनी समस्त मराठीजनांच्या मनातील चिंता बोलून दाखवली आणि ती मिटवण्यासाठी मार्ग सुध्दा दाखवला आहे. नुसतं मराठी  वाचवा वाचवा म्हणण्यापेक्षा कृती करा. हा ब्लॉग लिहिणा-यानी कधीच हिंदीची चिंधी करुन मराठी बोलण्यास सुरुवात केली आहे! त्यामुळे हक्कानी विनंती करतो. मराठीतच बोला आणि साधूंनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजीची शिडी सारखा वापर करा!



ग. त्र्य. माडखोलकर नगर, कुसुमानील नगरी (नागपूर) ता. 2 - झपाट्याने बदलणाऱ्या जगात मायमराठीचे संचित टिकविण्यासाठी थोडी हिंमत धरून महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठीच बोला, असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांनी आज केले. ......
जगातील बारा- पंधरा प्रमुख भाषांपैकी असलेल्या मराठीचा आत्मा गमवायचा नसेल, तर हे करावेच लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. येथे सुरू झालेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व प्रख्यात साहित्यिक नामवरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी श्री. साधू बोलत होते. मुख्य संरक्षक दत्ता मेघे, अनिल देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्यवाह वामन तेलंग, स्वागताध्यक्ष गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उन्हाची वाढलेली तीव्रता, एरव्ही तुलनेने सामसूम असलेला सिव्हिल लाईन्स परिसर आज गजबजला होता. साहित्य शारदेच्या मंगल सोहळ्यासाठी हजारो रसिकांची पावले माडखोलकर नगराकडे झपाझप निघाली होती. दुपारी चारच्या आधीच दहा हजार क्षमतेचा मंडप खचाखच भरून गेला होता.

गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्राचा इतिहास गुणात्मक घसरणीचा आहे, असे स्पष्टपणे नमूद करून मराठी माणसालाच मराठी बोलण्याची लाज वाटते, हे दाहक वास्तव श्री. साधू यांनी मांडले. प्रशासन, राजकारण, औद्योगीकरण, अर्थकारण, शिक्षण आदी क्षेत्रांत महाराष्ट्राची गेल्या 25 वर्षांत वेगाने पीछेहाट होत आहे, असे सांगून ते म्हणाले, ""जागतिकीकरणाच्या लाटेवर कौशल्याने स्वार झाले पाहिजे. सांस्कृतीकरण व साहित्यकारण हे राजकारण, अर्थकारण व समाजकारणापासून वेगळे राहू शकत नाही.''

लेखक, समीक्षकही श्री. साधू यांच्या टीकास्त्रातून सुटले नाहीत. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादेपासून दूरच्या एखाद्या गावात लिहिणाऱ्यांना कोणी विचारत नाही. उपेक्षित भागातील शेकडो कवी साहित्य विश्‍वाने दखलही न घेतल्याने खुडून जातात, हे मराठी साहित्याचे नुकसानच आहे, असे सांगून ते म्हणाले ""समीक्षकांची साहित्यिकांशी जास्त घसट असू नये. मराठी सांस्कृतिक विश्‍वाचा एकोपा साधण्यासाठी तरी समीक्षकांचे वेगळे प्रभावी व्यासपीठ असले पाहिजे.'' मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करीत आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयीचे प्रेम ढोंगी आहे. त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेचा अभिमान पोकळ आहे, असे सपासप फटकारे ओढतानाच दहा कोटी लोकांची माय मराठी मरणपंथाला वगैरे निश्‍चितच लागलेली नाही, असा विश्‍वासही श्री. साधू यांनी ठामपणे व्यक्त केला. मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापाराविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्‍वास हेच हिंदी भाषकांचे राज्यात होणारे स्थलांतरामागील आणि मराठीच्या पीछेहाटीमागील मुख्य कारण आहे, असे सांगून मराठी ज्ञानभाषा होणे आता शक्‍य नाही व कोणत्याच भाषेवर मराठीचे प्रभुत्व नाही, असे स्पष्टपणे नमूद केले. तत्कालीन साहित्यिक व मराठी अभिजनांनी मराठीला ज्ञानभाषा न करण्याचा अपराध केला आहे, असेही खडे बोल त्यांनी सुनावले. आज संक्रमणावस्थेतील मराठीसाठी त्याग करण्याची तयारी कोणत्याच मराठी वर्गाची नसूनही पुढील एक- दीड शतकात मराठी भाषेत गुणात्मक बदल घडेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.