नुकतंच पुण्याला एक मराठी चित्रपट विषयक कार्यक्रम झाला होता. तेथे मराठी लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा असे आवाहन केले गेले. श्वास नंतर मराठी चित्रपट, संगीत यांना चांगले दिवस आलेत हे नक्की पण बहुतेक रसिक चित्रपट डीवीडी/सीडी वर पाहणे पसंत करतात. मीही त्यातला एक. मला विशेषत: नवी मराठी गाणी अत्यंत आवडतात.
ग्राहक हा राजा असतो. चित्रपट-उद्योगाच्या बाबतीत देखिल हे खरं आहे. मराठी चित्रपट चालत नाहीत याचं खापर प्रेक्षकांवर फोडणे गैर आहे. भावनीक आवाहन केले ते ठीक पण मराठी चित्रपट निर्मात्यांना हे सांगावंस वाटतं की तुम्ही चित्रपट तयार केला आहे व तो कुठे दाखवणार आहात याचीच माहिती जर आम्हाला नसेल तर याचा दोष कुणाचा? मराठी वाहिन्यांची भरभराट होत आहे (त्यांना कसे प्रेक्षक मिळतात?) व त्यामुळे 'झबरदस्त' सारख्या चित्रपटांची माहिती होते (या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत फालतू बनवला आहे!) पण जर जवळपासच्या कोणत्याच चित्रपटगृहात तो लागला नसेल तर आम्ही कसा बघणार? मराठी चित्रपटांचा लेटेस्ट प्रॉब्लेम म्हणजे चित्रपटगृह मिळत नाहीत हा आहे. आणी हा प्रॉब्लेम प्रेक्षकांनी नाही तर निर्माते व महाराष्ट्र-सरकार यांनी सोडवायचा आहे. जे लोक पुणे शहरात,कोथरुड परिसरात राहतात ते आवर्जून चित्रपट पहायला जातात. प्रभात व सिटीप्राईड मध्ये मराठी चित्रपट चांगला गल्ला कमावतात. याचाच अर्थ की मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावयास तयार आहे पण तो घरच्या जवळ तर लागला पाहिजे ना? उपनगरात राहणारे प्रेक्षक केवळ चित्रपट पहायला शहारात येणार नाहीत. जे थेटर-मल्टिप्लेक्स चालक मराठी चित्रपट दाखवित नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. आज पुण्यात हिंदी-इंग्रजी सोबत एकेक तमिळ व कन्नड चित्रपट देखिल लागलेत. पैकी शिवाजी (तमिळ) व एक कन्नड चित्रपटास झबरदस्त, एवढंस आभाळ, मु.पो.लंडन या प्रमुख मराठी चित्रपटांपेक्षा जास्त खेळ व थेटर मिळाले आहेत!! ही विषादाची गोष्ट आहे व मराठी चित्रपट महामंडळ व महाराष्ट्र सरकारच यावर काही उपाय करु शकतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment