Showing posts with label Marathi television. Show all posts
Showing posts with label Marathi television. Show all posts

06 March 2007

मी मराठी सुरु झाली, Mi Marathi started!


काल अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु झाली. मागील १०-१५ दिवसांत दोन नव्या वाहिन्या सुरु झाल्या आहेत, झी २४ तास आणी मी मराठी, त्यामुळे खूप आनंद झाला. मी मराठीचा एकूण थाट भव्य व आकर्षक आहे. मी काल अनेक मालिका पाहिल्या. पैकी भरत जाधवची 'दोन फूल एक डाऊटफूल' (यात त्याच्या दुसरी गुजराती बायको मराठी छान बोलते!- अधुरी एक कहाणी मधील एक रडरड रडणारी बया येथे चांगलं काम करतीये!), दावत, दिलखूलास, दोष ना कुणाचा इ. मालिका चांगल्या वाटत आहेत. त्याच बरोबर अधिकारी ब्रदर्सनी 'रटाळ' सह्याद्री-दुरदर्शन साठी बनवलेल्या 'रटाळ' मालिका पुन्हा आमचा छळ करायला दाखवत आहेत. दामिनी, बंदिनी आणखी काही-बाही मालिका पुन्हा बोर करायला उपटल्या आहेत. असो, पण ई.टी.वी मराठी पे-चॅनल झाल्यामुळे आमच्या केबल वाल्यानी बंद केल्यामुळे महिलावर्ग चांगलाच चिडला आहे! वर पठ्ठयाने झी २४ तास सुरु केला नाहीये.

03 March 2007

सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु Saregamapa auditions started

सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु झाल्या असून पुण्यात ५ मार्च कर्वे रोड येथे आहेत. मला भाग घ्यायचा नाहीये पण तेथे जाऊन जरा वातावरण पाहीन म्हणतो! आमच्या इथुन ई.टी.वी मराठी घालवल्यापासून निराशेचे वातावरण आहे. चार दिवस सासूचे, काटा रुते कुणाला, गोजिरवाण्या घरात इत्यादी मालिका दिसत नाहीयेत! असो ५ मार्चलाच मी मराठी वाहिनी सुरु होत आहे तर त्याबद्दल उत्सुकता आहे. पाहूया कशी आहे ती. घरावरील केबलची वायर हलवायला हवी नीट दिसत नाहीये केबल आमच्याकडे!

25 February 2007

सारेगमप महागायक विजेता- अभिजीत कोसंबी Saregamapa winner Abhijeet Kosambi

काल आयडिया सारेगमपची महाअंतिम फेरी दिमाखात झाली. फक्त निकाल काय तो धक्कादायक होता. मंगेश बोरगांवकर किंवा अनघा ढोमसेंपैकी कोणी जिंकावे अशी माझी इच्छा होती पण जिंकला अभिजीत कोसंबी! खरं सांगायचं तर हा अभिजीत मला इतका चांगला गायक अजिबात वाटत नाही. महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली ते ठीक आहे पण अनघा व मंगेश ह्यांचं गाणं अत्यंत कानांना मधुर वाटतं. मला संगीतातले काही समजत नाही पण अभिजीतला 'मल्हार वारी' आणि सावरखेड-एक गाव मधले 'हे गाव माझे' या उत्तम गाण्यांची वाट लावताना मी ऐकले आहे! काल बाद झालेल्या स्पर्धकांनी सोहळ्याच्या सुरुवातीला म्हटलेले 'तु चाल पुडं तुला रं गड्या भीती कुनाची' हे गाणं सर्वात उत्तम होते.

असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?

24 February 2007

झी २४ तास आणि मी मराठी

मला खूप आनंद झालाय! झी नेटवर्कची झी २४ तास ही मराठीतील पहिली वृत्तवाहिनी सुरु
झाली आहे आणि लौकरच अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु होत आहे. मराठी
दुरचित्रवाणीचे क्षेत्र विस्तारत आहे हे पाहून बरं वाटतंय. आमच्या कंबख्त केबलवाल्यानं झी २४
तास अजून सुरु केली नाहीये आणि त्याच बरोबर ई.टी.वी मराठी बंद केली आहे. (पे चॅनल झालंय
म्हणून?) मी मराठीचे चाचणी प्रक्षेपण पाहिले. माझ्या मते ही वाहिनी लोकप्रिय होण्यास
वेळ लागणार नाही. फक्त दामिनी, बंदिनी सारख्या मालिका दाखविल्या नाहीत म्हणजे मिळवली!

11 January 2007

सा रे ग म प Sa re ga ma pa


परवा झी मराठी वरचे सारेगमप पाहिले. आमच्या घरी ई.टी.वी चे जास्त प्रस्थ असल्यामुळे मला झी मराठीवरच्या कार्यक्रमांची जास्त माहिती नव्हती. ३१ डिसेंबरच्या एका कार्यक्रमात सारेगमपची मंडळी औरंगाबादेत गात होती. (अगं बाई अरेच्चा मधील 'मल्हार वारी' या झकास गाण्याची वाट लावत होती!) पण नंतरची दादा कोंडक्यांची गाणी ठीक म्हटली. तेव्हापासून मला सारेगमप माहित झाले आणि मराठीत reality show चालू असल्याचे समाधान वाटले.

परवा प्रथमच पूर्ण भाग पाहिला. नव्या गाण्यांचा विशेष भाग होता. महेश मांजरेकर (भयानक चेहरा आणि तोडकं मराठी बोलत होता. हिंदीत गेल्यावर यांचे चालढंग, कपडे आणि केसं सगळंच बदलत!) विशेष अतिथी होता. बहुतेक स्पर्धकांनी चांगली गाणी म्हटली. BTW माझी फ़ेवरेट मुंबईची आनंदी जोशी आहे. तिचा चेहरा आणि आवाज खूप आवडला! आनंदी ने अवधूत गुप्ते याचे गाणे म्हटले. मी कधी ऐकले नव्हते पण हा माणूस चांगला संगीतकार आहे. इतर काही स्पर्धकांनी सुध्दा त्याची गाणी म्हटली. कोल्हापूरच्या अभिजीत कोसंबीने 'वाऱ्यावरती रंग पसरले..' ह्या सुंदर गाण्याची वाट लावली.

पण सगळ्यात कमाल केली ते अनघा आणी मंगेश बोरगावकरानी. अनघाने कोणतं गांण म्हटल ते आठवत नाही पण मंगेशनी श्रीरंग गोडबोले लिखीत आणि अजय-अतुलचे संगीत असलेले 'महाराष्ट्र-गीत' म्हटले. ते त्यानी इतके जोशात गायले की अवधुतने म्हटल्याप्रमाणे अंगावर काटा उभा राहिला. सिंगर ऑफ द डे चा मान अर्थातच त्याला मिळाला. मी आता सारेगमपचे पुन:प्रक्षेपण कधी होतंय त्यावर नजर ठेवुन आहे. मला त्याचे गाणे रेकॉर्ड करायचं आहे. असो तुम्ही वोट देत आहात ना? या वेळेसचे माझे मत आनंदीला दिलं (आयडीया कंपनी चोर आहे,तीन रुपये पडतात एका smsला!) म्हणून मंगेशला वोट bsnl वरुन देणार आहे!