03 February 2007

अरुण साधु म्हणतात मराठीत बोला! Arun Sadhu says ''converse in Marathi''

अरुण साधू यांनी समस्त मराठीजनांच्या मनातील चिंता बोलून दाखवली आणि ती मिटवण्यासाठी मार्ग सुध्दा दाखवला आहे. नुसतं मराठी  वाचवा वाचवा म्हणण्यापेक्षा कृती करा. हा ब्लॉग लिहिणा-यानी कधीच हिंदीची चिंधी करुन मराठी बोलण्यास सुरुवात केली आहे! त्यामुळे हक्कानी विनंती करतो. मराठीतच बोला आणि साधूंनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजीची शिडी सारखा वापर करा!



ग. त्र्य. माडखोलकर नगर, कुसुमानील नगरी (नागपूर) ता. 2 - झपाट्याने बदलणाऱ्या जगात मायमराठीचे संचित टिकविण्यासाठी थोडी हिंमत धरून महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठीच बोला, असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांनी आज केले. ......
जगातील बारा- पंधरा प्रमुख भाषांपैकी असलेल्या मराठीचा आत्मा गमवायचा नसेल, तर हे करावेच लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. येथे सुरू झालेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व प्रख्यात साहित्यिक नामवरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी श्री. साधू बोलत होते. मुख्य संरक्षक दत्ता मेघे, अनिल देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्यवाह वामन तेलंग, स्वागताध्यक्ष गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उन्हाची वाढलेली तीव्रता, एरव्ही तुलनेने सामसूम असलेला सिव्हिल लाईन्स परिसर आज गजबजला होता. साहित्य शारदेच्या मंगल सोहळ्यासाठी हजारो रसिकांची पावले माडखोलकर नगराकडे झपाझप निघाली होती. दुपारी चारच्या आधीच दहा हजार क्षमतेचा मंडप खचाखच भरून गेला होता.

गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्राचा इतिहास गुणात्मक घसरणीचा आहे, असे स्पष्टपणे नमूद करून मराठी माणसालाच मराठी बोलण्याची लाज वाटते, हे दाहक वास्तव श्री. साधू यांनी मांडले. प्रशासन, राजकारण, औद्योगीकरण, अर्थकारण, शिक्षण आदी क्षेत्रांत महाराष्ट्राची गेल्या 25 वर्षांत वेगाने पीछेहाट होत आहे, असे सांगून ते म्हणाले, ""जागतिकीकरणाच्या लाटेवर कौशल्याने स्वार झाले पाहिजे. सांस्कृतीकरण व साहित्यकारण हे राजकारण, अर्थकारण व समाजकारणापासून वेगळे राहू शकत नाही.''

लेखक, समीक्षकही श्री. साधू यांच्या टीकास्त्रातून सुटले नाहीत. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादेपासून दूरच्या एखाद्या गावात लिहिणाऱ्यांना कोणी विचारत नाही. उपेक्षित भागातील शेकडो कवी साहित्य विश्‍वाने दखलही न घेतल्याने खुडून जातात, हे मराठी साहित्याचे नुकसानच आहे, असे सांगून ते म्हणाले ""समीक्षकांची साहित्यिकांशी जास्त घसट असू नये. मराठी सांस्कृतिक विश्‍वाचा एकोपा साधण्यासाठी तरी समीक्षकांचे वेगळे प्रभावी व्यासपीठ असले पाहिजे.'' मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करीत आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयीचे प्रेम ढोंगी आहे. त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेचा अभिमान पोकळ आहे, असे सपासप फटकारे ओढतानाच दहा कोटी लोकांची माय मराठी मरणपंथाला वगैरे निश्‍चितच लागलेली नाही, असा विश्‍वासही श्री. साधू यांनी ठामपणे व्यक्त केला. मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापाराविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्‍वास हेच हिंदी भाषकांचे राज्यात होणारे स्थलांतरामागील आणि मराठीच्या पीछेहाटीमागील मुख्य कारण आहे, असे सांगून मराठी ज्ञानभाषा होणे आता शक्‍य नाही व कोणत्याच भाषेवर मराठीचे प्रभुत्व नाही, असे स्पष्टपणे नमूद केले. तत्कालीन साहित्यिक व मराठी अभिजनांनी मराठीला ज्ञानभाषा न करण्याचा अपराध केला आहे, असेही खडे बोल त्यांनी सुनावले. आज संक्रमणावस्थेतील मराठीसाठी त्याग करण्याची तयारी कोणत्याच मराठी वर्गाची नसूनही पुढील एक- दीड शतकात मराठी भाषेत गुणात्मक बदल घडेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

No comments: